Description
या कविता संग्रहातील काही कविता वाचा:
सुटका
सुटका
दुपारची शांतता एखाद्या गुहेसारखी
खिडकीबाहेर झुलणाऱ्या गव्हाच्या लोंब्या,
तू येथे बसली आहेस शांत जुन्या कोपऱ्यात,
माझे मन भरकटत जाते शेतात
घराच्या सर्व खोल्या पार करत
गुहेचा थंडगार काळोख ओलांडत
सभोवतीचे सूर्यप्रकाशाचे तुकडे उचलून हातात
मी धावत सुटतो मोकळ्या माळरानात, उजाड टेकड्यांभोवती
निळे आकाश खेचत जाते मला
वारा ढकलत जातो मला
तुझ्यापासून दूर… दूर…
अन् प्राचिन आठवणीतून बाहेर येत
जेव्हा तू साद घालतेस खिडकीतून
जग थांबते स्तब्ध, नदी वळण घेते अचानक
अन् माझ्या मनाचा भोवरा फिरू लागतो तुझ्याभोवती
मरूउद्यान
मरूउद्यान
क्षितिजावर एक काळा ठिपका, हळूच मोठा झाला
अन् जवळ येऊन उंटावरचा म्हातारा बनला
वाळवंट तप्त, ताऱ्यांना गिळून शांत
उंट, तहानलेला, पाय खेचत थकलेला
वाळवंटाच्या हिरवळीत दोघेही
श्वासांमध्ये ख़ुशी भरत सुखावलेले
मरुउध्यानात कायम मुक्कामी प्रवाशास बघत चिंतीत म्हातारा, “मुला,
प्रवास सोडून मुक्काम येथे? घडलेय काय असे?”
“घाबरतोय मी सूर्याला, पुढच्या अज्ञाताला, माझे नशीब आजमवण्याला,
राहीन म्हणतो येथेच पाण्याशी, खजुरांच्या उशाशी.”
दृष्टिक्षेपात ठेवत दूरच्या उंटाला म्हातारा पुटपुटला,
“ऐकले नसशील जरी, तरी ही हवा वाहेल तुझ्याबरोबर
विसरला असशील जरी, तरी मृत्यू वाट बघत राहील
दुर्लक्षित केले जरी, तरी वाळूच्या टेकड्या रात्रीतुन उठून जातील
उमजेल रहस्य विश्वाचे तुला एखाद्या रात्री,
चालशील तू जेव्हा जेव्हा राहील
मरूउध्यान सोबतीला तेव्हा तेव्हा.”
प्रेषिताची शोकांतिका
प्रेषिताची शोकांतिका
आकाशातला बाप्पा जेव्हा माझ्या घरी आला
तेव्हा त्याला बसायला मी घोंगडी आंथरली व म्हटले
“ही एका विचार पसरवणाऱ्याची चंद्रमौळी झोपडी आहे.
येथे का वेळ दवडतो आहेस?”
असे म्हणत मी काही विचार बाहेरच्या अनुयायांच्या विचारार्थ पाठविले
देव हसला.
देव म्हटला, “हे विचार पसरविणाऱ्या, आपले मन झाडून स्वच्छ कर.”
मी उठलो.
हातात झाडू घेतला व मन झाडून स्वच्छ केले.
देव काळवंडला. देव हसला.
त्याने माझ्या मनातला कचरा तळहातावर घेऊन त्यावर फुंकर मारली
झोपडीचे रुपांतर प्रार्थनागृहात झाले
माझे अनुयायी आतमध्ये आले
मला प्रार्थनागृहाच्या मध्यभागी उभे करण्यात आले
अन विचारांएवजी, बाहेर प्रसादाची ताटे जाऊ लागली
Reviews
There are no reviews yet.