पद्मा आजींच्या गोष्टी

$0.00

पद्मा आजींच्या गोष्टी ची सुरुवात झाली जेव्हा मी माझ्या आईशी गप्पा मारत बसलो होतो  आणि तिने काही तिच्या जुन्या आठवणी सांगितल्या.
त्या गोष्टी इतक्या मनोरंजक होत्या कि मी म्हटले या गोष्टींना लिहिलेच पाहिजे.

बघता बघता तिने गोष्टी सांगितल्या आणि मी त्या लिहिल्या. मायबोली.कॉम वेब् साईट वर त्यांना फार प्रतिसाद मिळाला.
काही गोष्टी इथे वाचा.

 

Category: Tag: Product ID: 428

Description

पद्मा आजींच्या गोष्टी १ : आत्या आणि पाऊस
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर. हि माझ्या आत्याची — आवडाबाईची गोष्ट.

तशी माझी आत्या काही शिकलेली नव्हती फारशी. पण वाचू शकत होती ती. आयुर्वेदाची तर फार औषधे माहिती होती तिला. तर्हेतर्हेची औषधे ती सांगायची. वेळोवेळी आम्हाला बरे करायची औषधे देऊन. औषधाबरोबर काहीतरी मंत्र पठन चालायचे तिचे — जरा कोडेच होते आम्हाला. तिच्या अनेक गोष्टी आहेत पण प्रामुख्याने मला जिने विचार करायला लावला तीही गोष्ट.

एकदा काय झाले कि — माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होते. आणि नेमका जोरदार पाउस सुरु झाला लग्नाच्या आदल्या दिवसापासून. आता प्रश्न पडला लग्न होईल कि नाही. धो-धो पाऊस. कार्यालयात हि कसे जावे असा प्रश्न. कार्यालयात सामान तरी कसे न्यायचे आत्ता? सगळ्यांना भीती पडली. वरात तरी येईल कि नाही आशा धारेत?

सगळे डोके धरून बसले. तर माझी आत्त्या समोर आली. म्हणाली थांबा. मी ऎक उपाय करते त्याच्यावर. तर तिने काय केले — परत आंघोळ केली आणि देवापाशी बसली. देवापाशी तिने काय केले तर आपला पाटा-वरवंटा आसतो ना, त्या वरवंटाला ऎक छान असे फडके गुंडालले. आणि एका पटावरती त्याची स्थापना केली.

आणि मग म्हटले तिने — काय तिचे मंत्र वगैरे होते — आम्हला कल्पना नाही — पण होते तिचे फार पठन. पण तिने मंत्र म्हणून पूजा केली त्या वरवंटाची. हळद कुंकू आगदी नेवेध्य दाखवून. सगळी व्यवस्थित पूजा केली. आणि सांगितले मी हे उचले पर्यंत या ठिकाणी पाऊस पडता कामा नये.

तर आम्हा सगळ्यांना हेच वाटले कि असे कसे होऊ शकेल? आमच्या काही गोष्टी हरवल्या तर मंत्र वगैरे म्हणायची ती पण पाऊस ला पडू नये म्हणणे काय? आम्ही सगळे चकित होतो. आम्ही ऐकले होते फक्त आशा गोष्टी. पण हे आत्याचे काही आसे असेल हि कल्पनाच काही डोक्यात आली नव्हती कधी.

तिने ती पूजा-बिजा केली आणि आश्चर्य म्हणजे काय दहा मिनिटात इतके कोरडे झाले आभाळ कि कुठे पाऊस नाही कि पावसाचा थेंब नाही कुठे. पण काही जास्त विचार न करता आम्ही पळालो कार्यालयात.

झाले सगळे सामान नेले. सगळे झाले. लग्न झाले, बहिण सासरी गेली. मग दुसऱ्या दिवशी माझे वडील तिला म्हणाले — जरा विनोदानेच — आवडाबाई आत्ता उचला ते तुमचे नाहीतर लोक आपलाल्या म्हणतील आमचा पाऊस तुम्ही बंद केला.

बरे, आवडाबाई म्हणाली. मग तिने काय केले — अंघोळ केली आणि आतमधून गुळ आणला. जवळ जवळ सव्वा किलो गुळ. तिने त्या गुळाचा नेवैध्य दाखविला आणि सांगितलेकी मी आत्ता हे उचलते आहे आणि आत्ता तुम्ही पाऊस पडू द्या.

परत आशर्याची बाब — तिने ते नेवैद्य दाखवून, पूजा करून उचलले आणि इतका जोरात पाऊस सुरु झाला लगेच.

सगळ्यांना फारच नवल वाटले. मीही काही वेळा विचार करते कि कसे झाले असेल ते? तेव्हा ना वेधशाळा होत्या ना काही मार्ग होता पाऊसा बद्दल माहिती काढण्यास. पण एक गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितली — तिने आस्थान मांडले आणि पाऊस बंद. उठवले आणि पाऊस सुरु. आणि हे सगळे सांगून कि मी पाऊसा चा उपाय करते ताबडतोब.

तुम्ही योगायोग म्हणा कि सिद्धि म्हणा. गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

पद्मा आजींच्या गोष्टी २: ब्रम्ह देवाच्या गाठी
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर.
माझ्या आधीच्या गोष्टीला ज्यांनी अभिप्राय दिले आणि मला उत्तेजन दिले त्यांचे मनपुर्वक आभार.

एकदा मी आणि माझ्या college च्या मैत्रिणी माझ्या अमरावतीच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात माझी आत्या – आवडाबाई – आली आणि ती पण आम्हाला सामील झाली. आम्ही एका मैत्रिणीच्या लग्नाविषयी बोलत होतो. तेव्हा आत्याने मला म्हटले तुला तुझ्या आईच्या लग्नाची गोष्ट माहिती आहे का? सगळ्यांनी उत्सुकता दाखवल्यावर तिने गोष्ट सुरु केली.

आवडाबाई — “तुझ्या आजोबांनी तुझ्या आईचे लग्न ठरविले. त्या काळात लहान वयात लग्न होत. तुझी आई सगळ्या मोठी. लग्नाची तयारी सुरु झाली. लग्न तीन दिवसावर आले. मांडवाची तयारी सुरु झाली ओझारकरांच्या वाड्यात.

तेव्हा तुझ्या आजीला पाच का सहा महिन्यांचा मुलगा होता. त्याला पाळण्यात निजवून कामे चालली होती.

आम्ही सगळे लाडू बनवत होतो. तेवढ्यात तुझ्या आजीची किंकाळी ऐकू आली आतमधून. मी धावत गेले. बघते तर काय तुझी आजी रडत होती जोरजोरात. पाल्ण्याटला मुलगा श्वासच घेत नव्हता. अचानक श्वास बंद झाला होता त्याचा. डॉक्टरला बोलाविले. आजोबांना कोर्टातून बोलाविले. डॉक्टरांनी फार प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते काही करू शकले नाही. त्या मुलाचा — म्हणजे तुझ्या आईच्या भावाचा मृत्यू झाला.

काय करावे? सगळे शोकाकुल. तुझ्या आईचे लग्न जिथे ठरविले होते — मोठे जहागीरदार होते ते — त्यांनाहि कळविली. ते आले. बराच खल झाला. काही लोक म्हणे लग्न मोडा. काही म्हणाले मुलगा तर फार लहान होता. असे होतच. लग्न होऊ द्या. मुलाचे वडील हो म्हणत होते. पण मुलाचा काका अडला होता. शेवटी लग्न मोडले.

तुझ्या आजोबांवर तर दोन संकटे. एकीकडे मुलगा गेला. आणि दुसिर्कडे मुलीची चिंता. काय करावे. मांडव लागलेला. मुलीचे पुढे काय होणार? कोण करणार लग्न? फार काळजी. फार गंभीर. आशा मुलींची लग्ने होत नसत नंतर. तेव्हा आशा गोष्टी फार असायच्या.

तर कोणीतरी तुझ्या आजोबांना एका प्रसिद्ध स्वामींकडे नेले. आजोबांनी सांगितले त्यांना सगळे. स्वामींनी ध्यान लावले आणि ते म्हणाले. “चांगले झाले मोडले. समजेल तुम्हाला. तुमचा कोणी भाचा आहे का जो इंदोरला असतो? त्याच्याशी करून द्या.”

आवडाबाई ने गोष्ट सुरु ठेवली. “तुझ्या आजोबांचा दूरचा भाचा — म्हणजे माझा भाऊ — होता इंदोरला. Law शिकायला. तेव्हा आतेघरी मुलगी द्यायचे. झालं आजोबांनी माझ्या वडिलांशी बोलणी केली. सगळे तयार झाले. पण माझा भाऊ, म्हणजे तुझे होणारे वडील, होता इंदोरला. त्याला तार केली — ताबडतोब निघून ये. तेव्हा फोन नव्हते. त्यामुळे मुलाला काही माहित नाही का बोलावले इतक्या तातडीने. ईकडे मुलगा येणार का नाही हेही माहित नाही.

माझा भाऊ जेव्हा आला बडनेरा स्टेशन वर तेव्हा तो वरात बहुन चकित. विचारतो कोणाची वरात तर समजले त्याचीच स्वतःची. त्याला तोपर्यंत माहीतच नव्हते. स्टेशन वरून सरळ मांडवात.” हे सगळे आठवून आवडाबाईला इतके हसू फुटले कि आम्ही सगळे म्रेत्रिणी हसू लागलो.

आवडा आत्याने पुढे सांगितले. “नंतर समजले कि तुझ्या आईचे ज्या मुलाशी आधी लग्न ठरले होते तो मुलगा काही महिन्या नंतर वारला. तेव्हा सगळ्यांना समजले गुरुजी असे का म्हणाले होते कि लग्न मोडले ते बरे झाले.”

ब्रह्मदेवानी ज्या गाठी जोडल्या त्या तुम्ही चुकवू शकत नाही. हे माझ्या आई – वडिलांच्या लग्नामुळे माझ्या डोक्यात बसून राहिले.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

पद्मा आजींच्या गोष्टी ३ : आजोबा आणि साप
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला प्रोसाहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.

मी आज तुम्हाला माझ्या आजोबांची गोष्ट सांगणार आहे. एकदा आम्ही सगळे भावंडे जमली असताना माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितली.

वडिलांनी गोष्टीला सुरवात केली. “एकदा काय झाले, तुमचे आजोबा दर्यापूरचे काम आटपून घरी आले. त्या वेळी बस किंवा रेल्वे नव्हत्या जास्त. बरासचा प्रवास पायी पार पाडावा लागे.

आजोबा आले आणि माडी वरच्या खोलीत जाऊन जात्या वर डोके ठेवून झोपी गेले. तुमची आजी स्वयंपाक करत होती. त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला नैवद्य दाखवून मग जेवणाची पद्धत होती.

तुमच्या आजीने मला सांगितले “जा रे बापुना उठव आणि जेवायला बोलव.”

मी गेलो वरच्या खोलीत आणि बघतो तर काय वडील झोपले होते शांतपणे आणि त्यांच्या डोक्यापाशी एक मोठा नाग फणा काढून बसलेला. माझी तर बोबडीच वळली.

मी धावत खाली आलो आणि आई ला म्हटले. “आई, आई, साप… साप.”

“कुठे?”

“बापू…बापूंच्या डोक्यापाशी. लवकर चल.”

आई ने लक्षच दिले नाही पहिल्यांदा. “चल. काय बोलतोस. कुठला साप. घरात कुठून आला? ताट मांड चल.”

पण मी तिला ओढलेच हात धरून. “खरे सांगतोय. मोठ्ठा नाग आहे.” मला तर रडायलाच येत होते भीतीने.

तुमची आजी जेव्हा वर आली तर नाग बघून ओरडायला लागली. “अहो उठा. अहो उठा पटकन. बघा. साप आहे मोठ्ठा.” ती ओरडून सगळ्यांना बोलवायला लागली. “साप…साप.”

त्या सगळ्या कोलाहलात साप हलायला लागला. बापूही जागे झाले. त्यांनी एक डोळा उघडून नागा कडे बघितले आणि परत डोळे बंद करून पडले व म्हणाले. “तो मला काय करणार नाही. तो आला तसा निघून जायेल. घाबरू नका. आवाज न करता खाली जा. मी येतो नंतर.”

“अहो पण…”

“जा. जा. सापाला घाबरवू नका.”

पण आजी काही हलायला तयार नाही. रडत रडत तिने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली.

बापूंनी पुढे म्हटले. “अग, तुला माहिते आहे ना आपल्या घराण्यात साप पासून धोका नाही. ती गोष्ट ठावूक नाही का? जा. सापाला घाबरवू नका. जा म्हणतो ना मी.”

बापू आम्हला समजावत असतानाच नागाने तोंड वळविले आणि तो हळूच खाली उतरला. व शांतपणे गत्च्ची कडे निघून गेला.

नंतर घरी काका वगैरे आल्यानंतर सगळ्यांनी सापाला शोधले पण तो काही सापडला नाही.

मी मग तुमच्या आजोबांना त्यांनी ज्या गोष्टी चा उल्लेख केला होता त्या बद्द्ल विचारले. तेव्हा त्यांनी मला एक जुनी गोष्ट सांगितली. — पाळेकर घराण्यात म्हणे कोणी एक आंधळे गृहस्थ होते. ते दररोज गोदावरी नदीच्या घाटावर येउन बसत असत आणि सूर्याला अर्घ्य देवून ध्यान करत. बरेच लोकही त्यांना मानत. त्यावेळी हमखास ऎक नाग त्यांच्या आजुबाजू घोटाळे. कधी कधी तर आगदी खेटून असायचा. ते आंधळे गृहस्थ पण त्याच्या अंगावरून हात फिरवत असत. तेव्हापासून सापांचे रक्षण करायचे असा आपल्या घराचा नियम होता.

गोष्ट ऐकल्यावर मी लगेच माझे कॉलेजी डोके चालविले व वडलांना म्हटले. “अहो तो साप विषारी नसेल.”

वडील पण हसले व म्हणाले. “जेव्हा तुझ्या आजाबांनी मला हि गोष्ट सांगितली तेव्हा मी सुद्धा हेच म्हटले. पण नंतर एक लक्षात आले — बरे झाले बापू घाबरून घाईत उठले नाहीत. त्यांनी शांतपणे घेतले म्हणून आपत्ती टळली.”

काही का असेना, पण मी मात्र नंतर बरेच दिवस वरच्या खोलीत एकटे जायचे टाळले.

गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.

आवडल्या? अजून गोष्टींसाठी संपर्क करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पद्मा आजींच्या गोष्टी”

Your email address will not be published. Required fields are marked *